Chagan Bhujbal : मराठा आऱक्षणाच्या मुद्द्यामुळे काही दिवसांपासून महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. त्यानंतर भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमकी सुरु झाल्या. मात्र, या संघर्षात ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ ठामपणे समोर येतायत. विशेषत राष्ट्रवादी अजित पवार गटानं मराठा आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतलेली असताना भुजबळांनी ठामपणे पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. 


विचारसरणीच्या लढाईची भुजबळांकडून सुरुवात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच काय तर अंतरवाली सराटी फाट्यावरच भुजबळांनी भाषण केलं, बीडमध्ये हिंसाचारात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. खास मराठवाडा दौरा काढला. ओबीसींसाठी भुजबळांचं रस्त्यावर उतरणं बरंच काही सांगून जातं. इतक्यावरच भुजबळ थांबले नाहीत तर ओबीसीतून आरक्षण देतील ते सत्तेबाहेर जातील असा इशाराच त्यांनी महायुतीला दिला आहे.


वैचारिक भूमिकेसाठी पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेण्याची भुजबळांची भूमिका


जेव्हा जेव्हा ओबीसींच्या हक्कांचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा छगन भुजबळ ठाम भूमिका घेताना दिसले. वैचारिक भूमिकेसाठी पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेण्याची भुजबळांची ही पहिलीच वेळ नाही.. ओबीसींच्याच मुद्द्यावर भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंचीही साथ सोडली होती.


मंडल ते मराठा..छगन भुजबळांचा लढा


भुजबळांनी ओबीसींसाठी शिवसेना सोडली होती.   मंडल आयोगामुळे वातावरण पेटलेलं असताना भुजबळ शिवसेनेत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंडला आयोगाला विरोध केला. त्याचवेळी महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा शरद पवारांनी केली. मंडल आयोगाच्या मुद्द्यावरुन भुजबळांनी बाळासाहेबांची साथ सोडली.  त्याचवेळी समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसींसाठी आपलं कार्य सुरुच ठेवलं.


भुजबळांच्या भूमिकेचा अजित पवारांना फटका?


ओबीसींच्या हक्कांसाठी छगन भुजबळांनी राजकीय परिणामांचा विचार न करता कठोर भूमिका घेतली याला इतिहास साक्षीदार आहे. आता मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे छगन भुजबळ हे पुन्हा वैचारिक लढाईच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सुरु झालीय.  भुजबळांच्या भूमिकेचा अजित पवारांना फटका बसू शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे.