रिक्षात बसताच सुरु व्हायचं `बंटी बबली`चं नाटक; पोलिसांनाच फसवायला गेले तेव्हा...
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजी नगरात सुरु असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांवर खोटे आरोप लावून त्यांना फसवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरात (chhatrapati sambhaji nagar) एका बंटी बबली जोडीचा धक्कादायक कारनामा पुढ आला आहे. रिक्षात (rickshaw) प्रवाशाला बसवायचं आणि नंतर महिलेला छेडलं म्हणून त्या प्रवाशाची लूट करायची असा प्रकार या जोडीकडून सुरु होता. या रिक्षाचालकाने आणि त्याच्या मैत्रिणीने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांना लुटल्याचं तपासात पुढे आलं आहे. दोन्ही आरोपी ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य करायचे. बदनामीच्या भीतीने कोणीही तक्रार करायला पुढे यायचं नाही. त्यामुळे आरोपींनी जवळपास शंभरच्या वर लोकांची फसवणूक केली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस (chhatrapati sambhaji nagar police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील कविता आणि सुनील यांनी ग्रामीण भागातून आलेला लोकांना लुटण्याचा एक अनोखा धंदा सुरु केला होता. रिक्षा चालक सुनील आणि त्याची मैत्रिण कविता हे बस स्टॅंडवर रिक्षा घेऊन थांबायचे. ग्रामीण भागातून प्रवासी आला की त्याला हेरायचे. कुठे जायचं आहे असे विचारात स्वस्तात सोडतो म्हणून त्या व्यक्तीला रिक्षात बसवायचे. सुनील रिक्षा चालवायचा तर कविता रिक्षात मागे बसायची. थोडं अंतर कापलं की सुनील आणि कविताचं खरं नाटक सुरु व्हायचं. या प्रवाशाने मला छेडलं अशा पद्धतीचा कांगावा कविता करायची. त्यानंतर धमकी देऊन दोघेही प्रवाशासोबत वाद घालायचे. अखेर बदनामीला कंटाळून सहप्रवासी खिशातले पैसे, मोबाईल सोन्याच्या अंगठी सगळं काही काढून कविता आणि सुनीलला द्यायचे. अशी ही लूट गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती..
दरम्यान, कुणीतरी एका प्रवाशाने पोलिसांना या प्रकारची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला एका कर्मचाऱ्याला सहप्रवासी म्हणून दोघांच्या रिक्षात बसले. रिक्षात बसताच कविताने प्रवाशाने छेडल्याचा कांगावा सुरु केला. मात्र पोलिसांनी फसवणूक करताना रंगेहाथ पकडल्याने दोघांनाही घाम फुटला. अखेर पोलिसांनी याप्रकरणात दोघांनाही अटक केली आहे. तसेच ज्यांना ज्यांना या दोघांनी लुटले आहे अशा लोकांनी तक्रारी करण्यासाठी पुढे यावं असा आवाहन पोलिसांनी केले. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून हा सगळा प्रकार धक्कादायक सुरु होता. त्यामुळे लोकांना कोण कसे लुटेल याचा नेम नाही. त्यामुळं आता रिक्षात बसतानाही सावधान राहण्याची आवश्यकता आहे.
लिफ्ट मागून तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या अटक
आजारी असल्याचा बहाण करुन पादचारी मुलीस स्वत:च्या गाडीवरुन पुढे सोडण्यास सांगून अश्लील चाळे करणाऱ्या सदाशिव पेठतील एकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी त्यांचा मोबाईल नंबर सार्वजनिक केला होता. त्यावर आलेल्या मेसेजची दखल घेऊन पोलिसांनी काही तासात या नराधमाला अटक केली. अनुप प्रकाश वाणी (वय 44, रा. शनिवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे.