Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजी नगरमध्ये महिलांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असा प्रश्न पडावा अशी धक्कादायक घटना घडली आहे. येथील पुंडलीक नगर भागामध्ये एका गुंडाच्या टोळक्यानं एका 20 वर्षीय तरुणीचा तिच्या घरात घुसून विनयभंग केला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र या प्रकरणामध्ये शहरातील कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघाल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की घडलं काय?


बँकेची परीक्षा देऊन ही तरुणी घरी येत असताना एका गुंडाच्या टोळक्यानं अगदी घरापर्यंत तिचा पाठलाग केला. हे गुंड एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या तरुणीच्या मागेमागे जात थेट तिच्या घरात प्रवेश केला. तरुणीच्या आईला चाकूचा धाक दाखवत त्यांनी या तरुणीचा तिच्याच घरात घुसून विनयभंग केला. या तरुणीबरोबर या गुंडांनी अश्लील चाळे केले. या तरुणांनी पीडितेला ओढून नेण्याचाही प्रयत्न केला.


महिलांमध्ये दहशतीचं वातावरण


पुंडलीक नगर तसेच शिवाजी नगर भागामधील गेल्या 5 दिवसामधील महिला अत्याचाराची ही चौथी घटना आहे. इथली तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे. वारंवार या ठिकाणी अशा घटना घडताना दिसत आहेत. स्थानिकांच्या दाव्यानुसार, या गुंडांच्या टोळक्याला पोलिसांचाही धाक उरलेला नाही. हे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलवीत अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. येथील महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.


मागील 5 दिवसांमध्ये चौथी घटना


30 जानेवारी रोजी गुंडांनी मुलीच्या घराची तोडफोड केल्याची घटना याच भागात घडली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 जानेवारी रोजी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. 2 फेब्रवारी रोजी काही गुंडांनी एका महिलेच्या घरातील सामना थेट रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर आता 4 फेब्रुवारी रोजी 20 वर्षीय तरुणीच्या थेट घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अगदी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.



विरोधकांकडून वाढत्या गुन्हेगारीवरुन टीकास्त्र


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही गुंडगिरीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा तसेच संत-महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. मात्र मागील 2 वर्षांपासून घोटाळेबाजांचा आणि गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची ओळख करण्यात शिंदे सरकारने प्रगती केली आहे असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.