शिक्षकानेच क्लासमधील अल्पवयीन मुलीला पळवलं; पोलिसांना पाहताच नदीत उडी, पण...
Teacher Run Away With Minor Girl: आपली मुलगी शिक्षकांबरोबर पळून गेल्याचं लक्षात आल्यानंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. पोलीस 12 जूनपासून या मुलीचा शोध घेत होते.
Teacher Run Away With Minor Girl: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे खासगी क्लासला येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला शिक्षकानेच फूस लावून पळून नेलं आहे. या शिक्षकाला करमाडा पोलिसांनी भोपाळमध्ये जाऊन पकडलं. मात्र पोलीस आपल्या शोधात आल्याचं पाहून या शिक्षकाने विषारी औषध प्राशन करुन नर्मदा नदीत उडी मारली. शिक्षकाने उडी मारल्याचं पाहून या मुलीने पोहता येत नसतानाही नदीत उडी मारली. ही मुलगी बुडू लागल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी नदीत उड्या घेत या मुलीला आणि आरोपी शिक्षकाला बाहेर काढून ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव महेंद्र साठे असं असून तो 42 वर्षांचा आहे.
कंप्युटर ट्रेनिंग केंद्रात भेट अन् भोपाळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र साठे आणि या अल्पवयीन मुलीची भेट एका खासगी कंप्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये झाली. ही मुलगी लाडसावंगी तालुक्यातील या कंप्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये क्लाससाठी जायची. या मुलीला 12 जून रोजी फूस लावून पळवून नेलं. या मुलीच्या पालकांना मुलगी शिक्षकाबरोबर पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी करमाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून 12 जूनपासून तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांच्या टेक्निकल टीमने साठेचा माग घेतला असता तो भोपाळमध्ये असल्याची माहिती मिळाली. सायबर पोलीस योगेश तलमरे यांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक तपासानुसार पोलिसांची एक टीम भोपाळमधील नेमार गावात पोहोचली. या ठिकाणी मंदिरासमोर आरोपी शिक्षक आणि ही अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या नजरेस पडले.
नदीत उडी घेतली अन्...
पोलीस येत असल्याचं पाहताच साठेनं खिशातून विषारी औषध काढून नर्मदा नदीमध्ये उडी मारली. अचानक आपल्या प्रियकराने उडी घेतल्याचं पाहून अल्पवयीन मुलीने घाबरुन नदीत स्वत:ला झोकून दिलं. मात्र पोहता येत नसल्याने ही मुलगी पाण्यात गटांगळ्या घेऊ लागले. त्यावेली बीट अमलदार दादासाहेब पवार यांनी मुलीला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. त्यांनी या मुलीला सुरक्षित स्थळी नेल्याने या मुलीचा जीव वाचला. त्यानंतर स्थानिक मुलांच्या मदतीने नदीत उडी मारलेल्या आरोपी साठेलाही पोलिसांनी बाहेर काढलं. या प्रकरणामध्ये करमाड पोलीस दोघांनाही घेऊन भोपाळहून परतले असून ते पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी जीवावर उदार होऊन या अल्पवयीन मुलीला वाचवलं आणि आरोपीलाही पकडल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.