लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : चोर समजून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात घडली आहे. बुलडाणा इथले सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे हे भाऊ विशाल कांबळे, सासरे संजय निकाळजे आणि सुनील निकाळजे यांच्यासह अरणगाव परिसरात गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी आपल्या कारने आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ग्रामस्थांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार न थांबल्याने दुचाकी आडवी घालून कार थांबवण्यात आली. यावेळी जमलेल्या 20 ते 25 जणांनी कारमधल्या चौघांना बाहेर काढून लोखंडी रॉड, बांबू, दगड आणि काठीने मारहाण केली. अरणगाव सरपंच वेळीच आल्याने त्यांनी मारहाण करणाऱ्या जमावातून चार जणांना सोडवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या मारहाणीत चारही जण किरकोळ जखमी झाले आहेत. 


पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांचे भाऊ विशाल कांबळे यांचा गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे खरेदीसाठी ते खेडोपाडी जात असतात. यानिमित्तानेच ते अरणगाव इथे आले होते. पण गावरान कोंबड्या न मिळाल्याने ते तिथून निघाले. त्याचवेळी ग्रामस्थांनी त्यांना अडवलं आणि मारहाण केली. तसंच त्यांच्या गाडीवरही दगडफेक करत मोठं नुकसान केलं.



काही दिवसांपूर्वी वंजारवाडी येथे दिवसा घरफोडय़ा झाल्या होत्या. त्यामुळे अनोळखी वाहन दिसल्याने गैरसमजुतीतून ग्रामस्थांनी किरण कांबळे यांची कार अडवून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यापुढे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोणी अनोळखी जात असेल तर मारहाण न करता पोलीसांना कळवावे असं आवाहन करण्यात आलं आहे.