रस्त्यात बंद पडलेली रुग्णवाहिका दिसली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत
रस्त्यात बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून मदत केली. आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचे निर्देश दिले
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.
या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्याना समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्याने त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.
अखेर क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.
मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेने मदत केलेली पाहुन सोनवणे यांच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानिमित्ताने त्यांच्या संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाला आहे.
कार चालकाला मदत केली
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दौरा आटोपून घरी चालले होते. त्यावेळी अंधेरी उड्डाणपुलावर एका कारला आग लागल्याचं त्यांना दिसलं. मुख्यमंत्र्यांनी आपली थाफा थांबवला आणि आग लागलेल्या कारची पाहणी केली. कार चालकाला धीर देत कारपेक्षा तुमचा जीव महत्त्वाचा, कार जवळ जाऊ नका अशी सूचना देत समजूत काढली. तसंच कारचालकाला मदत करण्याचे सूचनाही प्रशासनाला दिल्या.
पोलिस कर्मचाऱ्याची विचारपूस
काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातली बैठक संपवून ते निघत होते. त्यावेळी पोलीस शिपाई रूपाली साळुंखे तोल जाऊन पडल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. शिंदेंना हे समजताच त्यांनी स्वतःहून साळुंखेंची विचारपूस केली. आणि त्यांना रुग्णालयात दाखल करायचे आदेशही दिले. त्यांच्या या कृतीचं पोलीस दलात कौतुक होत आहे.