पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. पोलीस महासंचालकांची तीन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मोदी हे विमानाने आले. त्यावेळी लोहगाव विमानतळावर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री थेट मुंबईकडे रवाना झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. त्यानंतर फडणवीस नागपूरकडे रवाना झालेत.
मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच आज पुण्यात भेट झाली. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं पुणे विमानतळावर स्वागत केलं. यावेळी नागपूर निघालेले देवेंद्र फडणवीसही विमानतळावर हजर होते. उद्धव यांचे मोदींशी १० मिनिटे बोलणे झाले. व्हीआयपी लाऊंजमध्ये काही काळ फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्यातही चर्चा झाल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये सध्या या भेटीचीच चर्चा रंगली. पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान पुण्यात आलेत. दरम्यान, या भेटीनंतर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी फडणवीस-ठाकरेंची भेट झाली असली तरी या सरकारला सध्यातरी धोका नसल्याचं म्हटले आहे.
शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीकडे उत्सुकता लागलेली आहे. पंतप्रधानांचे स्वागत झाल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या काय चर्चा झाली की नाही, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, पुण्यात डीजीपी, आयजीपींच्या राष्ट्रीय परिषदेला गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी सायंकाळी पुण्यात दाखल झालेत. राष्ट्रीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या तीन दिवस परिषद चालणार आहे.
पाषाण येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) आणि पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) येथे ही परिषद आयोजित केली जात आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय अन्वेषण व गुन्हेशाखेचे प्रमुख आणि निमलष्करी दलाचे प्रमुखही या परिषदेला उपस्थित आहेत.