पुणे : पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इनक्युबेटरने पेट घेतल्याने जखमी झालेल्या नवजात बालकाचा मृत्यू झालाय. ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री 1च्या दरम्यान या बाळाचा मृत्यू झालाय. स्वाती कदम यांना प्रसूती वेदना होऊ लागल्याने सोमवारी रात्री पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटमध्ये भरती करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी त्यांची प्रसूती झाली. मात्र प्रसुतीनंतर बाळाला श्वसनाचा त्रास होत असल्यानं नवजात बाळाला इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तासाभरातच इनक्युबेटरने पेट घेतला. यांत बाळ गंभीररित्या भाजलं होतं. जखमी बाळावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान बाळाचा मृत्यू झालाय. 


बाळाच्या कुटुंबीयांनी वात्सल्य हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केलाय. बाळाच्या मृत्यूप्रकरणी वात्सल्य हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बालकाचा मृत्युनंतर पालिका प्रशासनाला जाग आलीय. वात्सल्य हॉस्पिटलला पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावलीय. तसंच रुग्ण भरती देखील थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत.