फटाक्यानं घेतला चिमुरड्याचा जीव, पालकांनो सावधान!
फटाक्याने मुलाचा बळी घेतल्याने गावात शोककळा
बुलडाणा : आता पालकांसाठी महत्त्वाची बातमी... फटाक्यानं एका चिमुरड्याचा बळी घेतलाय. बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराईमध्ये तोंडाजवळ फटाका फुटल्याने ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
यश गवते असं या मुलाचं नाव असून अंगणात खेळत असताना त्याने फटाका हातात असताना पेटवला आणि लगेचच तो फुटला.
मुलाची किंकाळी ऐकून घरातले बाहेर आले. तेव्हा यश हा रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने त्याला उचलून बुलडाण्याला नेण्याचा प्रयत्न केला गेला.
पण वाटेतच यशची प्राणज्योत मालवली. फटाक्याने मुलाचा बळी घेतल्याने गावात शोककळा पसरलीय.