लसीकरण आणि शाळा सुरू करण्याचा संबंध नाही!
कोरोनामुळे अजून शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत.
मुंबई : कोरोनाचा प्रभाव हा अनेक सामान्य गोष्टींवर पडला आहे. यामध्ये तो शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरही झालेला दिसला. कोरोनामुळे अजून शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांनी माहिती दिली आहे.
डॉ. समीर दलवाई यांच्या सांगण्याप्रमाणे, "राज्यातील शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पूर्ण तयारी झाली असेल तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होत असेल तर लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नाहीये."
शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण संपूर्ण व्हायला हवं. तसंच शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा सुरु करण्यात याव्यात. यामध्ये एक गोष्ट म्हणजे सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे, असंही डॉ. दलवाई यांनी म्हटलंय.
"मुलांना जरी करोना संसर्ग झाला तरी तो सौम्य स्वरुपाचा असतो. मुलांना लसीकरण कितपत उपलब्ध असेल, त्याचप्रमाणे किती जण घेतील याचा आणि शाळा सुरु करण्याचा काही संबंध नाही. शाळा सुरु करायच्या असतील तर मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हे नियम पाळावेच लागतील," असंही डॉ. दलवाई यांनी सांगितलं आहे.