औरंगाबादवरून चीनचं अंतराळ स्थानक जाण्याची शक्यता
चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.
औरंगाबाद : चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय. तूर्तास हे अंतराळ स्थानक समुद्रात पडेल, असं सांगण्यात येतंय. मात्र ते जमिनीवर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाहीय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात हे अंतराळ स्थानक कोसळेल, असा अंदाज आहे, त्यात भारताचाही समावेश आहे. जगभरातील तमाम अवकाश संशोधन संस्था या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेतील एरोस्पेस कॉर्पोरेशनच्या दाव्यानुसार, येत्या 1 एप्रिलला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 1 ते सायंकाळी 7 या वेळेत ते कधीही पृथ्वीवर कोसळू शकते.
स्कायलॅबच्या आठवणींना पुन्हा उजाळा
ताशी 28 हजार किलोमीटर वेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरताना तियाँगगाँग 1चे अनेक तुकडे होतील. त्यातील बराचसा भाग वातावरणाशी घर्षण होऊन जळून खाक होण्याचीही शक्यता आहे. 1979 मध्ये स्कायलॅब हे अमेरिकन अंतराळ स्थानक अशाचप्रकारे पृथ्वीवर कोसळलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियात त्याचे छोटे तुकडे विखुरले होते. तियाँगगाँग 1 च्या निमित्तानं स्कायलॅबच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे.