मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत १२५ तासांची व्हिडीओ क्लिप सादर केली. त्यात ज्या वकिलांचे संभाषण आहे ते वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांच्या संभाषणाबाबतची संपूर्ण चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासनाने चव्हाण यांचा विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा स्वीकारला आहे. मंत्री नवाब मलिक हे केंद्र सरकार विरोधात आवाज उठवत आहे. त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व वस्तुस्थितीचा तपास केला जाईल.


विरोधी पक्षनेते म्हणतात, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. मी देखील गृहमंत्री म्हणून काम केले आहे. देशात नियमाने काम करणारे असे महाराष्ट्राचे पोलिस दल आहे. ही भावना तुम्ही मंडळी आणि दुसरीकडे या पोलिस दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा अन्य यंत्रणेकडे द्या, असे म्हणत आहेत.


नवाब मलिक यांच्याविषयी काही गोष्टी आपण मांडल्या. नवाब मलिक हे पाच वेळा आमदार झालेले आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात ते आवाज उठवत होते.  त्यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केली गेली का? नवाब मलिक यांची केस सीबीआयला देऊन त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली.


१९९३ चा बॉम्बस्फोट होऊन आज बरीच वर्ष झाली. २००५, ०६, ०७  आणि ०८ मध्ये मुंबईमध्ये हल्ले झाले. विरोधी पक्षनेत्यांनी स्टिंग ऑपरेशनचा विषय काढला. १२५  तासांचा फुटेज असलेले पेन ड्राईव्ह अध्यक्षांकडे देण्यात आला. तुमचा आरोप काही जरी असला तरी मी कोणाचीही पाठराखण  करणार नाही. या सर्व घटनेच्या पाठीमागे नक्की कोण आहे?  हे आपल्याला तपासावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 


 


देवेंद्र फडणवीस हे गृह मंत्री होते. पाच वर्ष पूर्ण सत्ता तुमची होती. त्यावेळी हा तपास झाला असता तर अधिक योग्य झाले असते. राज्यसरकार आपली जबाबदारी टाळत नाही. जे यॊग असेल ते समोर येणारच आहे. लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांचे प्रकरणे हाताळण्यासाठी कमिटी स्थापन केली आहे. या धमक्यांच्या प्रकारात आपल्या सर्वांना काळजी घेतली पाहीजे. 


डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? 


विरोधी पक्षनेते, आपण मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना ३३ हजार विहिरांचा जलयुक्त शिवार कामाचा एक पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपुर्वी आपण एक पेनड्राईव्ह दिला. आजही एक पेन ड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? 


आजही देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मुदसीर लाबे याचे नाव घेतले. त्यांची निवड काही सरकारने केली नाही. तो निवडून आला आहे. सगळीकडे दाऊद दाऊद असे विनाकरण करू नका, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. 


गिरीशभाऊ निर्दोश राहिले तर सर्वाधिक आनंद होईल


गिरीश महाजन यांच्या प्रकरणाबाबत वाच्यता केली. महाजन यांच्याविरोधात काहीतरी कुभांड रचतोय, पोलिसांचा गैरवापर करतोय, असा आरोप केला. पण मराठा विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापन १९१७ मध्ये झालेली आहे. स्थापना झाल्यानंतर भोईटे आणि पाटील या दोन गटात वाद आहे. आता तो वाद कोर्टात सुटेल.


या संस्थेला पोलिस बंदोबस्त घेऊन शाळा का चालवावी लागते. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जरी असली तरी यामागची खरी वस्तूस्थिती समाजासमोर आली पाहिजे. नबाव मलिक आणि गिरीश महाजन यांच्या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास करायचा की नाही? पोलिसांच्या तपासात सत्य समोर येऊन गिरीशभाऊ त्यात निर्दोश राहिले तर मला सर्वाधिक आनंद होईल.