स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये सिडकोतल्या बोगस कर्मचा-यांचा पर्दाफाश केल्यानंतर आता या घोटाळ्याच्या चौकशीला वेग आला (CIDCO Scam). या प्रकरणी संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी झी २४ तासला दिली. तसंच या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी देखील केली जाणार आहे. मागील दहा वर्षांचं ऑडिट केलं जाणार असल्याचंही मुखर्जींनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस शिक्षक, बोगस डॉक्टर, बोगस खाद्यपदार्थ असे अनेक घोटाळे आपण पाहिले आहेत. मात्र, बोगस कर्मचारी आणि त्यांच्या नावानं कोट्यवधींचा पगार लाटल्याचा मोठी घोटाळा झी २४ तासच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. हा कोट्यवधींचा गैरव्यवहार परवडणारी घरं बांधणा-या नवी मुंबईतल्या सिडकोत झाला आहे. जे कर्मचारी सिडकोत कामच करत नाहीत त्यांच्या नावानं एक दोन नव्हे तर तब्बल पाच वर्षं पगार लाटला जात होता.


कायमस्वरुपी किंवा कंत्राटी पद्धतीवरही नियुक्ती झालेली नसताना या बोगस कर्मचा-यांच्या नावानं 2017पासून पगार काढला जात होता. पगाराची रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. बोगस कर्मचा-यांच्या नावानं 2017 पासून 50 ते 60 हजार एवढा तगडा पगार लाटला जात होता. धक्कादायक म्हणजे सिडकोतील कार्मिक विभागातील काही अधिकारीच या घोटाळ्यात गुंतल्याचा संशय आहे. 


सिडकोशी कोणताही संबंध नसलेल्या 28 बोगस कर्मचा-यांचा आतापर्यंत पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचा दाट संशय आहे. कारण हा घोटाळा कार्मिक विभागाच्या सहाय्यक विकास अधिकारी सागर तपडीया याच्या सह्यांनी झाला असल्याचं सिडकोच्या दक्षता कमिटीच्या चौकशीत समोर आले आहे. खुद्द तापडियानं हे मान्य केले आहे. धक्कादायक म्हणजे सागर तापडीयाला 2020ला लाच घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं होते. 


सिडकोचा दक्षता विभाग आता या घोटाळ्याची चौकशी करत असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, बड्या अधिका-यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा घोटाळा होणं शक्य नाही. त्यामुळे या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून सरकारी दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.  सरकारची तिजोरी लुटणा-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत झी २४ तास याचा पाठपुरावा करतच राहणार आहे.


सिडकोत बोगस कर्मचारी घोटाळा आहे तरी काय आणि आता काय कारवाई होणार?


  • 28 बोगस कर्मचा-यांच्या नावावर पगार काढला

  • प्रत्येक कर्मचा-याला प्रत्येकी दरमहा 50 ते 60 हजार पगार

  • 2017 पासून पगार काढून सिडकोला 3 कोटींचा गंडा घातला

  • कार्मिक विभागातल्या अधिका-यांचा घोटाळ्यात सहभागाचा संशय 

  • घोटाळ्यात सहभागी असलेला कार्मिक विभागातला अधिकारी फरार

  • चेतन नावाच्या व्यक्तीला आयकर खात्याची नोटीस

  • सिडकोतून बँक खात्यात पगार येत असल्यानं आयकर खात्याची नोटीस

  • सिडकोत काम करत नसतानाही पगार कसा जमा होतोय म्हणून चेतन बावत आणि अमित खेरालियांकडून सिडकोकडे तक्रार

  • कागदपत्रांच्या तपासणीतून सिडकोतला बोगस कर्मचारी घोटाळा उघड 

  • दक्षता विभागाच्या चौकशीत 28 बोगस कर्मचा-यांचा पर्दाफाश 

  • व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जींकडून सखोल चौकशीचे आदेश