मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : वर्धा जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून बेवारस श्वानांनी नागरिकांना चांगलंच वेठीस धरलं आहे. गेल्या १२ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ८ हजार ९१५ नागरिकांना बेवारस श्वानांनी चावा घेतल्याचं शासकीय आकडेवारीत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बेवारस श्वानांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेवारस आणि पिसाळलेल्या श्वानांच्या त्रासाला नागरिकांना कंटाळले आहेत. सकाळी, पहाटे फिरायला जाणं किंवा रात्री उशीरा कामावरून परतण्यावेळी श्वानांच्या पाठीमागे लागण्यामुळे, चावा घेण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. झाकीर हुसेन कॉलनी, इतवारा, फुलफैल तारफैल, आनंद नगर या परिसरातील मुलांना शाळेत जातांना बेवारस श्वानांचा त्रास होतो.


श्वानांचा एवढा नागरिकांना त्रास होऊन देखील याकडे पालिका प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नाही. नगरसेवकांना देखील माहिती देऊनही या श्वानांचा अद्याप बंदोबस्त करण्यात आला नाही.


जिल्ह्यात बेवारस श्वानांचा जन्मदर नियंत्रण ही समस्या मोठी आहे. या समस्येचं निराकरण होण्यासाठी केंद्र सरकारने आणि उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन सर्व राज्यातल्या प्रमुख सचिवांना सूचना दिल्या. मात्र म्हणावं तितकं याकडे लक्ष दिलं जात नाही.


काही श्वानांना रेबीज सारखे रोग झाले आहेत. श्वानांपासून खाजीचे रोग,  श्वसनाचे रोग, सर्दी, खोकला, निमोनिया यासारखे रोग होण्याची शक्यताही असते.


जिल्हात श्वान दंशाची  सरासरी बघितली तर दररोज २२ नागरिकांना दंश केल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे श्वानांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.