Heavy Rain In Maharashtra : कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडत आहे. जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली आहे. यासह रायगड, महाड तालुक्यात देखील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक नद्या नाल्यांना पुर आला आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 


खेड शहरावर पुराचे संकट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दोन दिवसापासून संततधार पाने पडणाऱ्या पावसामुळे खेड शहरातील जगबुडी नदीने रविवारी सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खेड शहरावर पुराचे संकट घोंघावत आहे. गेल्या 8 दिवसापासून इशारा पातळीच्या वरून वाहणाऱ्या जगबुडी नदीने अखेर रविवारी सायंकाळी धोका पातळी ओलांडली. यामुळे शहरातील व्यापाऱ्याची धावपळ उडाल्याचे पहावयास मिळत होते. 


खेड नगर पालिका, पोलीस प्रशासन व तालुका प्रशासन सज्ज असून जगबुडी नदीच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी जगबुडी नदीकिनारी असलेल्या अलसुरे गावाला भेट देवून पाहणी करीत येथील नागरिकांना देखील सुरक्षित स्थलांतरित करण्यात आल्याचे समजते. तसेच संभाव्य पुराचा धोका लक्षात घेवून खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला देखील तयार ठेवले आहे. त्याच प्रमाणे पुरापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानातील साहित्य देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात सुरुवात केली आहे. 


महाड तालुक्यातील वाळण विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस


महाड तालुक्यातील वाळण विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे.  संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाने  काळ नदी दुथडी भरून वाहू लागली.  सांदोशी, वारंगी, वाळणमध्ये रस्त्यावरून ओढ्यांचे पाणी वाहत आहे.  वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी घुसलेआहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 


गड नदीने ओलांडली धोक्याची पातळी 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदिला पूर आला असून गडनदिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शेतात घुसले असून गडनदी वर असलेल्या सर्वच पुलांवर पाणी आले आहे. पावसाची जोर असाच सुरू राहिला तर नदीचे पाणी वाड्यांमध्ये घुसण्याची भीती वर्तविली जात आहे. गडनदी शेजारील गावांना सतर्कतचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून पंचगंगा नदीचं पाणी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर आलंय... घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये.... सध्या पंचगंगा नदी ही 29 फुटांवरून वाहतेय.. जिल्ह्यातील एकूण 38 बंधारे पाण्याखाली गेलेय..