`काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती`
नागपूरमध्ये झालेल्या भाजपाच्या विजय संकल्प सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या भाजपाच्या विजय संकल्प सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला इंदू मिलची जागा हडप करायची होती. त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात त्या पक्षाचं सरकार असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न सुटू शकला नाही, असा आरोप त्यांनी केलाय.
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्याच्या मानसिकतेत तत्कालिन काँग्रेस सरकार नव्हतं. काँग्रेस सरकार फक्त घोषणा करत होतं. दुसरीकडं भाजपा सरकार मात्र कृतीवर विश्वास ठेवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आरोपांना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इंदू मिलची जागा काँग्रेसला बळकवायची होती हा मुख्यमंत्र्यांचा जावईशोध आहे. निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करण्याचा आणि खोटं बोलण्याचा हा प्रकार असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
बाबासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये करण्यासाठी काँग्रेसनं प्राथमिक मंजुरी आणली होती. बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं तिकडे भूमीपूजन केलं पण ३ वर्ष झाली तरी एकही वीट रचली गेली नसल्याचं सचिन सावंत म्हणाले. बाबासाहेबांचं स्मारक हे भाजपला निवडणुकीसाठी राम मंदिरासारखं वापरायचं आहे का? असा सवालही सचिन सावंत यांनी उपस्थित केला.
'काँग्रेसनं स्वत:चा विकास केला'
दरम्यान भाजपच्या विजय संकल्प सभेमध्ये नितीन गडकरी यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने ६० वर्षात जो विकास केला नाही तो भाजपा सरकारनं पाच वर्षांत केलाय. काँग्रेसने केवळ स्वत:चा विकास केला, असा घणाघाती हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गडकरींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या योजनांचा पाढा वाचला.
आम्ही संविधान मोडणार असा अपप्रचार काँग्रेसकडून सतत केला जातो. पण आम्ही संविधान मोडणार नाही, तर संविधानाचा वापर करून गरिब, वंचितांना न्याय मिळवून देऊ, असं गडकरी त्यांच्या भाषणात म्हणाले.