मुंबई : फडणवीस सरकारचं अखेरचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे तर उद्याच राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या या अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. विविध समाजगटांना आपलंसं करण्यासाठी १५ ते २० नव्या घोषणा होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुका असल्याने फेब्रुवारीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात आला नव्हता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या लेखानुदानाचं रूपांतर छोटया अर्थसंकल्पातच करत अनेक घोषणा केल्या होत्या. रविवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात धनगर समाजाला मोठा दिलासा देण्यात येईल असं सूतोवाच केलं. 


देशात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यातील महसूल वाढीसाठीच्या नवीन कर आकारणीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे नव्याने काही योजना हाती घेणं अवघड होतं. याच धर्तीवर अनेक समाजघटकांच्या दृष्टीने फायद्याच्या ठरतील अशा काही योजनांची घोषणा होण्याची चिन्हं आहेत.  


दरम्यान, धनगर समाजाविषयीच्या काही घोषणांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरीही त्याविषयीचा अधिक तपशील सांगण्यास मात्र नकार दिला होता. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर होत असतो. त्यानुसार मंगळवारी अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात येणार आहे.