CM Eknath Shinde : गेलं वर्षभर मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र विरोधकांचं स्वप्न साकार होणार नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केलंय. आम्हालाही अनेक विरोधकांशी एकाच वेळी मुकाबला करावा लागतो, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आम्ही जी क्रांती केली त्यामुळे आम्हाला राजकारणातलं ग्रँडमास्टर (Grand Master) म्हणतात असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.  पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद (Vishwanath Anand) मंगळवारी ठाण्यात होते, मात्र व्यस्त असल्यानं मुख्यमंत्र्यांना आनंद यांच्या कार्यक्रमाला भेट देणं जमलं नाही.  त्यामुळे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओद्वारे संदेश दिला आणि विरोधकांवर टीका केली.  राजकारणात खिलाडूवृत्ती हवी, बुद्धिबळाची राजकारणाशी तुलना योग्य नाही. असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शिंदेंच्या विधानावर केली. तर शिंदेंच्या राजकीय टोलेबाजीवर जितेंद्र आव्हाडांनी हात जोडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले मुख्यमंत्री?
विश्ननाथ आनंद यांनी राजकारणात यायला हवं होतं, राजकारणात एकाचवेळी अनेक विरोधकांचा मुकाबला करावा लागतो. काही उंटासारखी तिरकी चाल खेळतात, काही अडीच घरं चालणारे घोडे असता, तर काही हत्तीही असतात. पण विरोधकांनी कितीही बुद्धी पणाला लावली तरी जनता आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे विरोधक सातत्याने चितपट आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून महाविकास आघाडी, विशेषत: उद्धव ठाकरे गट आपल्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.  आमच्या ठाण्यात देखील ग्रँड मास्टर होते त्यांचं नाव घर्मवीर आनंद दिघे असल्याचं सांगायलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसरले नाहीत. 


मुख्यमंत्र्यांकडून स्नेहभोजनाचं आयोजन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे. वांद्रे इथल्या ताज लॅन्डस् एन्ड या हॉटेलमध्ये उद्या संध्याकाळी सात वाजता स्नेहभोजन पार पडणार आहे. अजित पवार गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसाठी आयोजित केलेले हे पहिलंच स्नेहभोजन असणार आहे. मंत्र्यांना यासंबधीच्या निमत्रंण पत्रिका देण्यात आल्या आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. त्यातच नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री कक्षातील वॉररुमची पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवरच हे अतिक्रम असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चाही सुरु जाली.


या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आता या स्नेहभोजनाला कोणते नेते उपस्थित राहतायत हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.