Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यात महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यानच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही असा शब्द देतानाच सुरक्षित बहीणही तितकीच महत्त्वाची असल्याचं सांगितलं. भगिनींच्या खात्यात लवकरच तिसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा होईल असे सांगतानाच, काहीही झाले तरीही ही योजना बंद होणार नाही असा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमापूर्वी बँकेपुढे गर्दी करणाऱ्या महिलांनाही मुख्यमंत्री शिंदेंनी एक आवाहन केलं.


दीड हजारावरून दोन हजार किंवा अधिक...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तुमचे चेहरे पाहून लाडकी बहीण योजना किती यशस्वी झाल्याची खात्री पटत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ही योजना डोळ्यात खूपत असल्याने काही लोकं नागपूर कोर्टात गेले. मात्र काहीही झाले तरीही ही योजना बंद होणार नसून उलट लवकरच या योजनेचा तिसरा हफ्ता तुमच्या खात्यात जमा होईल," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. "या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरीही काही जणांचा या योजनेवर संशय आहे. तुम्ही आम्हाला बळ दिलेत तर ही योजना दीड हजारावरून दोन हजार किंवा त्याहून जास्त वाढवू", असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


गैरवर्तन करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करणार


"दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असली तरीही महिला भगिनींसाठी ती छोटी नाही. आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के फी माफ केली, लेक लाडकी लखपती योजना सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखपती दीदी, ड्रोन दीदी अशा योजना सुरू केल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला पाहायचे आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. "ही योजना मतांसाठी नसून महिला भगिनींची पत वाढवण्यासाठी असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले. "जेवढ्या योजना शासनाने सुरू केल्या त्यातील एकही योजना बंद पडू दिली जाणार नाही," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. "लाडकी बहीण प्रमाणेच सुरक्षित बहीण देखील आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे महिला भगिनींशी गैरवर्तन करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करणार," असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.


उत्स्फूर्तपणे स्वागत केले


मुख्यमंत्री शिंदेंनी या सोहळ्याचे फोटो शेअर करताना, "यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे आमचे स्वागत केले करत आम्हाला राख्या बांधून सरकारने सुरु केलेल्या या योजनेबद्दल आमचे आभार मानले. आम्हीही फुलांची उधळण करत या विश्वासाची परतफेड केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत विविध योजनांचे लाभ महिलांना वितरित करण्यात आले," म्हटलं.


बँकेसमोर रांगा लावणाऱ्यांसाठी...


"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांग लावत असल्याचे वृत्त बघितले. माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय, निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय. काळजी करू नका," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन सांगितलं आहे.



अनेक नेत्यांची उपस्थिती


गुरुवारी झालेल्या कार्यक्रमाला सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, संजय रायमूलकर, राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, श्वेता महाले, आकाश फुंडकर, चंद्रकांत पाटील, किरण सरनाईक, माजी आमदार शशिकांत खेडेकर, चयनसुख संचेती, विभागीय आयुक्त निधी पांडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपस्थित होते.