मुंबई : सारे जग एका विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली  उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट  आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आपल्याला याबद्दल सार्थ अभिमान वाटत असल्याची भूमिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली. 


सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट  फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय  यामुळे होणार आहे.


वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबवितांना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावं असा सूरही त्यांनी आळवला. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय  शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक  केलं.