`कोरोना रोखण्यासाठी समन्वय ठेवा, रिपोर्ट वेळेत द्या`, पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते
पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा आहे, तसंच मृत्यूदर रोखण्यासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यावेळी सांगितलं.
कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुण्याच्या विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
'कोरोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या, जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर आणि समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल', असं मुख्यमंत्री म्हणाले.
'कोरोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच कोरोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब आहे, अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी', असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.