बारामती : मंत्रिमंडळ खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामतीत दिली आहे. झी २४तासच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात त्यांनी नकार दिला. बारामतीकरांनी एक लाख 65 हजाराच्या मताधिकऱ्यानं निवडून दिलं. त्यांची काम करायची असल्याचं ते यावेळी म्हणाले. सिंचन घोटाळ्यासंदर्भात मिळालेल्या क्लीनचिटवर देखील बोलण्यास त्यांनी नकार दिला. उपमुख्यमंत्री व्हावं असं कार्यकर्त्यांना वाटतं मात्र हा निर्णय पक्षप्रमुखांचा असल्याचं ते म्हणाले. तसंच काल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी मांडली होती. त्यामुळे सहज चर्चा झाली. यावेळी आम्ही हवापाण्याविषयी बोललो असं त्यांनी म्हटलं.


हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णयाचा अधिकार हा मुख्यमंत्री यांचा असल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला कोणतं आणि कोणाला मंत्रिपद मिळणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.


राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार येऊन दहा दिवस उलटले आहेत. तरी सरकारचा कारभार अद्याप सुरळीत सुरू झालेला नाही. खातेवाटप न झाल्यामुळे बिनखात्याचे मंत्री म्हणून बसण्याची वेळ सहा मंत्र्यांवर आली आहे. दुसरीकडे कार्यालयीन स्टाफविनाच मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना काम करावं लागतं आहे.


दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने उपस्थितांमध्ये चर्चा सुरु झाल्या. सोलापूरमधील करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने दोघं एकत्र आले होते. सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर फडणवीस आणि अजित पवार रविवारी पहिल्यांदाच एकाच ठिकाणी आले. त्यावेळी दोघांनी २० मिनिटं एकमेकांशी गप्पा मारल्या. 


सत्तासंघर्षातल्या त्या रात्री नेमकं काय घडलं, याचं सविस्तर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत दिलं आणि एकच खळबळ उडाली. खरंच शरद पवारांना हे सगळं माहित होतं का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला.
 
एका रात्रीत घडलेल्या शपथविधीच्या घडामोडीबद्दल फडणवीसांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अजित पवारांनी हे शरद पवारांच्या कानावर घातलं होतं. असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.