उल्हासनगर : रस्त्यात सापडलेले ५० हजार रुपये कंपाउंडरने प्रामाणिकपणे पोलिस ठाण्यात आणून जमा केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. यानंतर पोलिसांनी ही रक्कम ज्याची होती, त्याला परत केले असून प्रामाणिक कंपाउंडरचा पोलीस ठाण्यात सत्कार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगरच्या कॅंप १ भागात राहणारे अशोक बजाज हे त्यांच्या घरून निघून दुचाकीवर नवजीवन बँकेत ५० हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यासाठी निघाले होते. 


यावेळी रस्त्यात त्यांची पैसे असलेली पिशवी कुठे घरी पडून गहाळ झाली. याच दरम्यान कंपाउंडर म्हणून काम करणारे गोपाळ न्यायदे हे मधुबन चौकातून जात असताना त्यांना रस्त्यात एक पिवळी पिशवी आढळून आली. 


ही पिशवी त्यांनी उघडून पाहिली असता त्यात दोन पासबुक, एक चेक बुक आणि ५० हजार रुपये रोख रक्कम त्यांना आढळून आली. त्यामुळे त्यांनी तातडीने उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेत ही पिशवी जमा केली. 


पोलिसांनी पासबुकवरील माहितीच्या आधारे अशोक बजाज यांना पोलिस ठाण्यात आणून पिशवी दाखवली असता त्यांनी ही पिशवी आपलीच असल्याचं सांगितलं. 


यानंतर बजाज यांना हे पैसे परत करण्यात आले, तर प्रामाणिकपणे पैसे परत करणाऱ्या गोपाळ न्यायदे यांचा पोलिसांनी सत्कार केला.