भारतीय प्रशासकीय सेवेतील उमेदवारी रद्द केलेली प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला कोर्टाने दिलासा आहे. कोर्टाने मनोरमा खेडकरला जामीन मंजूर केली आहे. मुळशी येथे शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्या प्रकरणी मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोर्टाने अखेर याप्रकरणी तिला जामीन मंजूर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मनोरमा खेडकर येरवडा कारागृहात आहे. कोर्टाने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मनोरमा खेडकरला जामीन मंजूर केला आहे. मुळशी तालुक्यात जायचं नाही, या अटीवर कोर्टाने जामीन मंजूर केली आहे. दरम्यान कोर्टाने जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. 


1) तपास पूर्ण होईपर्यंत पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही


2) मुळशी तालुक्यात जायचं नाही


3) तक्रारदार तसेच साक्षीदारांशी संपर्क करायचा नाही. 


4) साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही.


5) गरज असेल तेव्हा तसंच पोलिसांकडून बोलावले जाईल तेव्हा तपास यंत्रणेसमोर हजर  राहावे लागणार. अशावेळी पौड पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई नाही.


6) पोलीस तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय पुणे जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही.


पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर केल्याचे आरोप झाल्यानंतर मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्या मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होत्या.  मनोरमा खेडकरसह पती दिलीप खेडकर यांच्यासह अंगरक्षकांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 


गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर फरार होती. पोलिसांनी महाडमधून तिला बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तसंच येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान दिलीप खेडकर यांनाही जामीन मंजूर झाला आहे. मात्र दुसरीकडे पूजा खेडकर सध्या फरार असून ती दुबईला पळून गेली असा संशय व्यक्त होत आहे.