शाळा सुरू करण्यावरून इंग्रजी शाळा आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष
`सर्व व्यवहार सुरू असताना केवळ शाळा बंद का?` इंग्रजी शाळांच्या या भूमिकेवर तुमचं काय मतं आहे?
मुंबई : कोरोनाच्या तिस-या लाटेमुळे राज्यात सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. मात्र अन्य सर्व व्यवहार सुरू असताना केवळ शाळा बंद का, असा सवाल करत इंग्रजी शाळाचालकांची संघटना, 'मेस्टा'नं सोमवारपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर, औरंगाबादसह काही शहरांमध्ये शाळा सुरू झाल्यात.
प्रामुख्यानं पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा पुन्हा सुरू झाल्याचा दावा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशननं केलाय. नागपुरात मेस्टाच्या पदाधिका-यांनी पालकांची बैठक घेतली आणि त्यांना शाळा सुरू करण्याचं महत्त्व पटवून दिलं. त्यानंतर अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास संमतीपत्रही दिलं.
ग्रामीण भागात पहिली ते बारावी आणि मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची घोषणा मेस्टानं केली आहे. राज्यात संघटनेशी संलग्न असलेल्या तब्बल 18 हजार शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांनी पुन्हा वर्ग भरवण्याची तयारी दर्शवल्याचा दावा मेस्टानं केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या असतील, तर कारवाईचं कारण नाही असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी आता इंग्रजी शाळा सुरू आणि मराठीसह अन्य माध्यमांच्या शाळा बंद असं चित्र राज्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं सर्वसमावेशक निर्णय घेण्याची गरज आहे.