COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती : अमरावतीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. माजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे.अनंत गुढे यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आल्याची चर्चा असल्यानं अडसूळ गट नाराज झाला आहे. गुढे यांनी लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनित राणा यांना मदत केल्याचा आरोप करत गुढे यांना मातोश्रीवर थारा नको, गुढे गद्दार आहेत असा आक्षेप माजी आमदार आणि  कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी केलाय. अभिजीत हे नवनित राणा यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत. अनंत गुढे हे आनंदराव अडसुळांचा प्रचार करताना कधी दिसले नाहीत. त्यामुळे अशा गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.


आजकाल मातोश्रीवर गद्दारांना माफ केलं जात. त्यामुळे आमच्यासारखे अंगावर केस घेतलेल्यांकडे दुर्लक्ष होत. या गद्दारांना पक्षातून बाहेर फेकले जावे असे ते म्हणाले. आनंदराव अडसूळ कसे नालायक आहेत, कसे वाईट आहेत हेच अनंत गुढे यांनी पेरले. गेल्या पाच वर्षात गुढेंनी आनंदरावांबद्दल विषाची पेरणी केली असेही अभिजीत अडसूळ म्हणाले. 



माझी आनंदराव अडसुळांसोबत कधी स्पर्धा नव्हतीच. मला जेव्हा पक्षप्रमुखांनी बोलावले तेव्हा मी गेलो. जितके प्रश्न त्यांनी विचारले त्यांची उत्तर मी दिले. शिवसेना ही माझी आई आहे आणि मातोश्री माझे मंदीर आहे असे अनंत गुढे यांनी म्हटले.