मुंबई : आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या भेटीला जात आहे. राज्यात सुरु असलेल्या ओला दुष्काळ आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या पार्श्वभुमीवर ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी राज्यापालांनी या नेत्यांना अद्याप भेटीसाठी वेळ दिली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पेटला आहे. जनतेने युतीच्या मतदान केले असले तरी जागावाटपावरून दोघांमध्ये विस्तव जात नाही आहे. पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री पदासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी शिवसेनेने केली आहे. तर गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत ही मागणी फेटाळल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेची आघाडीच्या नेत्यांशी जवळीक वाढलेली दिसत आहे. शिवसेनेकडून अद्याप कोणत्या प्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. ते खुलेपणमाने हे मान्य करत नसले तरी आतल्या आत खूपकाही शिजत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनीही याप्रश्नी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात काही नवे समीकरण जन्म घेणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 



पवारांशी जवळीक


काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी मुंबईतील पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या नव्हत्या. मात्र, आता राऊत यांनी अजूनही आपण फोनवरून शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. 


शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं. सध्या शरद पवार यांच्याशी कोण कोण बोलत आहे, या सर्वाची माहिती आपल्याकडे आहे. तसेच मी शरद पवार यांना भेटल्यानंतर ज्यांच्या पोटात पोटशूळ उठला होता तेदेखील पवारांना कसा आणि कुठे संपर्क साधू पाहत आहेत, हेदेखील मला पक्के ठाऊक असल्याचे राऊत यांनी सांगितले. 


तसेच यंदाच्या सत्तास्थापनेत केवळ एकाच पक्षाची भूमिका नाही. ते चित्र आता बदलले आहे. यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता हालचाली करत असल्याचे त्यांनी सांगितले. 


शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत दररोज पत्रकारपरिषद घेऊन भाजपला नवनवे इशारे देत आहेत. आजच्या पत्रकारपरिषदेतही त्यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडली. महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.