काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिवाळी अधिवेशनात संयुक्त मोर्चा
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीनं नागपूर हिवाळी अधिवेशनात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीनं नागपूर हिवाळी अधिवेशनात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या १२ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर धडकणा-या या मोर्चात काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी होणार सहभागी
राहुल गांधींनी या मोर्चात सहभागी व्हावी, अशी विनंती प्रदेश काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यानुसार राहुल गांधी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसमधील सूत्रांनी दिलीय.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राहुल गांधी देखील सहभागी झाल्यास हा मोर्चा आणखी प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. शेतक-यांच्या प्रश्नावरून सरकारच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी करण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली असून, त्यासाठी या हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.