चंद्रपूर : मनपाच्या आमसभेत काँग्रेस - भाजप गटनेते एकमेकांना भिडलेत. काँग्रेसचे नंदू नागरकर आणि भाजपचे वसंत देशमुख यांच्यात धक्काबुक्की झाल्याने प्रचंड गोंधळ झाला. सभागृहात पाणी प्रश्नावर सुरू होता वाद. नागरकर यांनी गोंधळात सभागृहात मातीचे मडके फोडले. यावरून एकमेकांच्या अंगावर  धावून गेले. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आवरल्यावर प्रकरण निवळले गेले. यावेळी कामकाज बघण्यासाठी आलेल्या महाविद्यालय विद्यार्थ्यांनी नगरसेवकांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर शहर मनपाची आजची आमसभा जोरदार गाजली. सभागृह सुरु होताच विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी शहराच्या विविध भागात असलेल्या पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. यावरून विरोधी महिला सदस्यांनी अचानक डोक्यावर मातीचे मडके आणत पीठासीन सभापतीपुढे जाण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे गटनेते नंदू नागरकर यांनी यातील एक मडके सभागृहात फोडले याचे तुकडे भाजप गटनेते वसंत देशमुख यांना लागले. यावरून वाद सुरू झाला. आणि हमरीतुमरीनंतर धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. 


भाजप गटनेते मद्यप्राशन करून सभागृहात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी १५ मिनिटांपर्यंत संघर्ष करून दोघांना दूर सारले. तेव्हा वाद निवळला. एकीकडे हे सुरु असताना अपक्षांचे नेते पप्पू देशमुख यांनी सभागृहात सत्ताधारी भाजपच्या पाणी, रस्ते, मागासवस्ती सुधार, अमृत पाणी योजना या अपयशी प्रकल्पांबाबत फोल आश्वासने देण्याची आठवण करून देण्यासाठी लॉलीपॉप वाटले. 


दरम्यान, चंद्रपूर शहर मनपात भाजपचे संख्याबळ जास्त आहे. याच आधारावर शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याची संधी भाजपला आहे. विरोध करणारे काँग्रेस नगरसेवक देखील बोटावर मोजणारे आहेत. मात्र अनभुवी महापौर, महापौर -नगरसेवकांत असलेली दरी यामुळे शहर विकासाचा मात्र बट्ट्याबोळ झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.