सांगली : विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्यावर शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलगा सत्यजित देशमुख यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्याआधी देशमुख यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिराळा येथे लोकांनी मोठी गर्दी केली होती. मार्केट यार्ड परिसरातील काँग्रेस भवन जवळ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांनतर कोकरुड या त्यांच्या गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग, माजी मंत्री विनय कोरे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या सहित विविध क्षेत्रातील हजारो लोकांनी साश्रु नयनांनी देशमुख याना अखेरचा निरोप दिला. 


विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचे काल मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी प्रदीर्घ आजारानं अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शिवाजीराव देशमुख यांचा १ सप्टेंबर १९३५ मध्ये जन्म झाला होता. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा सत्यजित, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवाजीराव देशमुख यांचा मुलगा सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
 
काँग्रेसचे एकनिष्ठ असणारा नेता आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले नेते अशी त्यांची ओळख होती. शिराळा मतदारसंघातुन त्यांनी सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसच्या सत्तेत त्यांनी गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अश्या जवळ पास सर्व अनेक महत्वाची खात्यावर त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. देशमुख यांच्या निधनानंतर सांगली परिसरात शोककळा पसरली आहे.