`गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने.....`, यशोमती ठाकूर पुन्हा वादात
मंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्या दिवसेंदिवस वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धी झोतात येत आहेत.
मुंबई : गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते. हे विधान कोणा भाजप नेत्याचं किंवा हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रवक्त्याचं नाही. तर हे विधान महिला आणि बालकल्याणमंत्री तसंच अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांचं आहे. यशोमती ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जातात. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्या दिवसेंदिवस वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धी झोतात येत आहेत.
'आपण आपली संस्कृती विसरत आहोत. गाईच्या दर्शनाने, तिच्या पाठीवर हात फिरवल्यामुळे नकारात्मक विचार निघून जातात. हा चमत्कार आपल्या संस्कृतीत असल्याचे' त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप होऊ लागला आहे.
यशोमती ठाकूर यांच्या या वादग्रस्त वक्तव्याशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असहमती दर्शवली आहे.
'खिसे गरम व्हायचेयत'
विरोधकांकडून लक्ष्मीदर्शन करुन कॉंग्रेसला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मंत्री पदाची आता आताच शपथ घेतल्याने आमचे खिसे आणखी गरम व्हायचे आहेत.
विरोधकांचे खिसे मात्र पाच वर्षात गरम झाले असल्याने मतदारांनी त्यांच्या कडून लक्ष्मीदर्शन करून घ्यावे मात्र मत पंजाला द्यावे असे खळबळजनक वक्तव्य कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.