नाशिक : येथे काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथील महिला आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतरही राज्यात काँग्रेसमध्ये विद्यामान आमदार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकादा स्पष्ट होत आहे. काँग्रेसमध्ये पडझड सुरुच असल्याची चर्चा आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसला इगतपुरी विधानसभा मतदारसंघातही धक्का बसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. इगतपुरीमधून सलग दुसऱ्यांदा त्या निवडणून आल्या आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात गावितांचे चांगले वर्चस्व असून ग्रामीण भागात त्यांनी अनेक कामे केल्याचे कार्यकत्यांकडून सांगण्यात येत आहे.  


मागील विधानसभा निवडणुकीत निर्मला गावित यांनी शिवसेनेचे शिवराम झोले यांचा पराभव केला होता. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर गावित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसेल. याठिकाणी गावित यांचा चांगला जनसंपर्क असून इगतपुरीमधून दोनदा आमदार झाल्या आहेत. तसेच आमदार गावित यांच्या कन्या नयना गावित या नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत.