Congress MLA Cross Voting :  विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वॉटिंग करणे काँग्रेसच्या आमदारांना चांगलेच महागात पडणार आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वॉटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत यांना तिकीट मिळणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 5 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. विधान परिषदेत विरोधात वोटिंग करणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होणार असल्याचं सूत्रांकडून समजते.
काँग्रेस हायकमांडने पाच आमदारांना तिकीट देऊ नका असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर 5 मतदार संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे नाना पटोले यांना काँग्रेस हाय कमांडने आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


कोण आहेत काँग्रेसचे बंडखोर आमदार 


सुलभा खोडके - अमरावती
झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व
हिरामन खोसकर - इगतपुरी
जितेश अंतापूरकर - नांदेड दक्षिण
मोहन हंबर्डे - देगलूर


विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय झाले?


विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मात्र या निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठं राजकीय नाट्य घडलं. शिवसेना ठाकरे गटाचे केवळ 16 आमदार आहेत. विजयासाठी 23 मतांची गरज होती. उर्वरित 7 मतांसाठी नार्वेकर काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर अवलंबून होते. ही मतं पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाल्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकरांना मतं द्यायची की, शेकापच्या जयंत पाटलांना? यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले. पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नाना पटोलेंनी ठाकरेंच्या बाजूनं कौल दिला तर विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जयंत पाटलांना मतं देण्याच्या बाजूनं होतं.  ज्या 8 आमदारांचा कोटा काँग्रेसनं ठरवून दिला त्या आमदारांवर ठाकरेंचा विश्वास नव्हता. ते आमदार क्रॉस व्होटिंग करतील आणि नार्वेकरांना दगाफटका होईल, अशी भीती ठाकरेंना वाटत होती.अखेर शिवसेना ठाकरे गटाला ज्याची भीती होती, तेच घडलं... काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. त्यामुळं जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार पराभूत झाले... ठाकरे गटाचे नार्वेकर आमदार म्हणून विजयी झाले..