`... तर मी विरोध करणारच`, बाजार समितीवरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी
Nana Patole on Ajit Pawar: बाजार समित्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले (Nana Patole) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. अजित पवार यांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Nana Patole on Ajit Pawar: बाजार समित्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले (Nana Patole) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. नाना पटोले यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी नाराजी जाहीर करत या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत यांना सुनावलं होतं. त्यावर आता नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर बाजार समिती निवडणुकीत भाजपासोबत एकत्र आली तर ते चुकीचं आहे असं सांगत आपण विरोध करणार असं म्हटलं आहे.
अजित पवारांनी काय म्हटलं आहे?
"काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्यं करत असताना. कारण नसताना महाविकास आघाडीत अंतर पडत आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याऐवजी त्यांनी मी, जयंत पाटील, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवं होतं. टाळी एका हातानेच वाजत नाही. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत," असं अजित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या सभेत मी हा मुद्दा मांडणार असल्याचा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.
"लातूर तालुक्यात महाविकास आघाडीला विचारलं जात नाही, काँग्रेस निर्णय घेतं अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांना मी जयंत पाटील यांच्या कानावर घालण्यास सांगितलं आहे. तुम्ही जर आम्हाला सोबत घेणार नसाल तर आमचा आम्हाला विचार करावा लागेल, मग इतरांना घेऊन पुढे जायचं का? अशी विचारणा करा असं मी त्यांना सांगितलं आहे," अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.
नाना पटोलेंचं प्रत्युत्तर -
"मी काहीही चुकीचं बोललो नाही. भाजपासोबत लढायचं असेल तर सर्वांना एकत्र यावं लागेल. राष्ट्रवादी जर भाजपासोबत स्थानिक पातळीवर बाजार समिती निवडणूकीत एकत्र आली तर ते चुकीचं आहे आणि त्याविरोधात मी बोलणारच," असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केला. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी, कुणाच्या मनात काय आहे हे माहिती नाही पण अजित पवार तसे जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.
नाना पटोलेंच्या कोणत्या विधानावरुन वाद
"बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्या पक्षाशी युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभारविरोधात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहोत, आमची ही लढाई सुरुच राहिल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या या मुद्द्यावर मविआच्या बैठकीत चर्चा करु. काँग्रेस पक्षातून जर कोणी स्थानिक पातळीवर भाजपाशी हातमिळवणी केली तर त्यांच्यावर मात्र पक्ष कारवाई करेल," असा इशारा नाना पटोले यांनी दिला होता.