`मर्दासारखी आंदोलन करावी`; मनसे आणि अबू आझमी पुन्हा एकदा आमने-सामने
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार अबू आझमी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. मनसेचे टोल आंदोलनावर अबू आझमी यांनी टीका केली आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार अबू आझमी यांच्यातील वाद तसा जुनाच आहे आज पुन्हा एकदा मनसे आणि अबू आझमी आमने-सामने आले आहेत. मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये मनसे आणि राज ठाकरे यांचा विषय आल्यानंतर अबू आझमी यांनी मनसे एकीकडे आंदोलन करते आणि दुसरीकडे सेटिंग करते मनसेने मर्दासारखी आंदोलन करावी अशी खोचक टीका केली.
मनसे च्या नादाला लागला तर थोबाड फोडू
मनसेचे सध्या ठाणे येथील आनंदनगर टोल नाक्यावर टोल दर वाढवल्यामुळे आंदोलन सुरू आहे मनसेने आज सकाळपासून ठाणे परिसरात साखळी आंदोलन केलं आणि या टोल दर वाढीचा विरोध केला याच आंदोलनावरून बोलताना अबू आझ मी यांनी मनसेवर अशा पद्धतीची टीका केली. तर अबू आझमी यांनी केलेल्या या टीकेवर मनसेकडूनही जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी अबू आजमी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे.अबू आजमी हा रानटी डुक्कर आहे यापूर्वीच मनसेने त्याला आसमान दाखवला आहे आम्ही मराठी आणि हिंदूंच्या हितासाठी आंदोलन करतो संविधानिक मार्गाने आंदोलन करतो आम्ही सेटिंग करत नाही एकदा अबू आजमी च्या कानाखाली आवाज काढला आहे मनसे च्या नादाला लागला तर त्याचं थोबाड फोडू.
मनसे आणि अबू आझमी हा जुनावाद पुन्हा उफाळून येणार
यापूर्वी देखील अनेकदा मनसेने अबू आजमी आमने सामने आले आहेत मुंबई महाराष्ट्र मराठी परप्रांतीय अशा संदर्भातील विषय आल्यानंतर अबू आझमी आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. 2009 साली मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते आणि शपथविधीच्या वेळी अबू आझमी यांनी विधान भवनात हिंदीतून शपथ घेतली या शपथविधीला मनसे आमदारांनी विरोध केला त्यावेळी मनसेचे आमदार असणारे आणि आता भाजपमध्ये असलेले राम कदम यांनी अबू आझमी यांच्या कानशिलात लगावली होती. आगामी वर्ष हे निवडणुकांचा आहे त्यामुळे मनसे आणि अबू आझमी हा जुनावाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.