पुणे : आता पुणे शहरात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेच्या स्थापनेवरून वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि ब्राम्हण महासंघ यांच्यात हा वाद पेटला आहे. 


प्रतिमा पुन्हा हटवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ७ मार्च दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने पुणे महानगर पालिकेच्या प्रांगणात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेची स्थापन करण्यात आली. तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवल्यावर स्थापन केलेली प्रतिमा काढण्यात आलीये. यावरून आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. 


संभाजी ब्रिगेडचा विरोध


पालिकेची जागा ही खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळे दादोजींच्या  प्रतिमेची स्थापना इथे होऊ नये अस सांगत संभाजी ब्रिगेड ने महापालिका आवारात घोषणाबाजी केली. अनधिकृत पणे प्रतिमा स्थापन केल्यानं ब्राम्हण महासंघावर कारवाई व्हावी यासाठी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देणार असून महापौर मुक्ता टिळक आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पाठिंब्या मुळेच ब्राह्मण महासंघाने प्रतिमा स्थापन केली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय.


काय आहे प्रकरण?


आंदोलन करत ब्राह्मण महासंघानं दादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेची स्थापना केली. २०११ साली लालमहालातून दादोजींचा पुतळा काढण्यात आला होता. या पुतळ्याची शहरात पुन्हा एकदा स्थापना व्हावी या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आलं. लाल महालात असलेल्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाल्यानतर हा पुतळा तिथून काढुन सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला होता.