बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा होणार
बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये
दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली आहेत. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा मिळणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.
राज्यातील साधारण १२ लाखाहून अधिक कामगारांना प्रत्येकी २ हजार याप्रमाणे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत या संदर्भातील निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात DBT पद्धतीने २ हजार रुपये जमा होणार आहेत.
इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून विभागाकडे जमा होत असतो. १ टक्का उपकर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून वसुल केला जातो. याची ९ हजार ९०० कोटी रुपये शासनाकडे बांधकाम कल्याण मंडळात आहेत.
या जमा झालेल्या उपकर निधीमधून कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. हा निधी कामगारांच्या सहाय्यासाठी वितरित येणार आहे.