नागपूर : आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला समर्थन दर्शवले आहे. तर नागरिकांनी गरज नसल्यास घरातच राहण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. दरम्यान जनता कर्फ्यूमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी, विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र बाळगावे असं सांगण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात कोरोना संसर्ग वाढत असताना नागरिक महापौरांच्या जनता कर्फ्युच्या आवाहानला कसा प्रतिसाद देतात. व्यापारी या जनता कर्फ्युला कशी साथ देतात हे महत्वाचं ठरणार आहे.  महापौर संदीप जोशी याबाबत म्हणाले जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद. ह्या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. 


जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय. त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, पोलिसांचे दंडे पडतील का, मनपाकडून दंड ठोठावला जाईल का हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून दोन दिवस घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


 ‘जनता कर्फ्यू’दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधींचे दुकाने वगळता काहीही सुरू राहणार नाही, याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे. अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. कोरोनाशी लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यू यशस्वी करणे आवश्यक आहे. यासाठी जनप्रतिनिधींनीही जनतेला उद्युक्त करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.


दरम्यान नागपुरात  कोरोनाबाधितांचा आकडा ६० हजार पार गेलाय. काल १७०३ नवे कोरोना पॉझिटीव्ह वाढले. तर ४५ जणांचा बळी कोरोनानं घेतला. त्यामुळं नागपुरात एकूण बाधितांची संख्या ६० हजार ९०२ इतकी झाली. तर मृतांची संख्या १९३५ पर्यंत पोहोचलीय.  महत्वाचं म्हणजे  काल ३०२४ जण एकाच दिवसात कोरोनामुक्त झालेत. तर आतापर्यंत एकूण ४८ हजार ३९६जण कोरोनामुक्त झाले आहेत.