पुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा घटला
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे पुण्यात बंद पाळण्यात येत आहे.
पुणे : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे पुण्यात बंद पाळण्यात येत आहे. पुण्यातल्या या बंदमुळे ब्लड बँकांमधला रक्ताचा साठा कमी झाला आहे. एका ठिकाणी १५ पेक्षा जास्त लोक येणार नाहीत, अशा पद्धतीने रक्तदान घडवून आणावे, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ब्लड बँकांना दिली आहे.
पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी सोडून सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यावा, अशी विनंती म्हैसेकर यांनी केली आहे. आयटी कंपन्यांच्याबाबतीत निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. सेवा सुरु ठेवण्यासाठी आवश्यक तेवढंच मनुष्यबळ ठेवावं. आरोग्य सेवा, बँकिंग, इन्शुरन्स सेवा देणाऱ्यांना पूर्णपणे काम बंद करता येणार नाही. त्यांनीही वर्क फ्रॉम होम सुरु करावं, असं आवाहन म्हैसेकर यांनी केलं आहे.
कोरोनाविरुद्धची ही प्रदिर्घ लढाई आहे. पक्षभेद, मतभेद बाजूला ठेऊन काम करावं लागणार आहे. ज्यांना होम क्वारंटाईन केलं आहे, त्यांनी आदेशांचं पालन करावं. आदेश पाळले नाहीत तर ते कायद्याचं उल्लंघन आहे, असा इशारा म्हैसेकर यांनी दिला आहे. तसंच घरात क्वारंटाईन व्हायची अडचण असेल, तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांची व्यवस्था करु, अशी प्रतिक्रिया म्हैसेकर यांनी दिली.