कोल्हापूर : चिकन आणि मासे खाल्ल्यानं कोरोनाची बाधा होत नाही, असं ओरडून ओरडून सांगितलं जातंय. मात्र तरीही भीतीपोटी लोकांनी चिकन आणि माश्यांपासून दोन हात लांब राहणंच पसंत केलंय. त्यामुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलाय. अंड्याच्या भावानं कोंबड्या विकायची वेळ आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरमध्ये सेल लावून कोंबड्यांची विक्री केली जात आहे. अवघ्या १०० रुपयांमध्ये ५ कोंबड्या मिळत आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीनं ग्राहकांनी चिकन खाणं सोडून दिलंय. त्यामुळे धुळवडीच्या मुहूर्तावर अक्षरशः सेल लावून कोंबड्या विकण्यात आल्या. सकाळी २०० रुपयांना पाच या दरानं कोंबड्यांचा सेल लागला होता. दुपारनंतर तर १०० रुपयांत पाच कोंबड्या विकण्यात आल्या.


उस्मानाबादेतही हीच परिस्थिती आहे. १० आणि २० रूपयांना कोंबड्या विकल्या जातायत. पण हॉटेलमध्ये मात्र चिकन प्लेट पूर्वीच्याच दरात म्हणजे दीडशे ते अडीचशे रुपयांनाच विकली जातेय. म्हणजे एकीकडं पोल्ट्री व्यावसायिक कवडीमोलानं कोंबड्या विकतायत, पण दुसरीकडं ग्राहकांची लूट सुरूच आहे.


कोरोनामुळे चिकनकडं कुणी ढुंकूनही पाहत नाहीत. तर दुसरीकडं मटणाच्या दुकानांपुढं रांगा लागल्या आहेत. पिंपरीमध्ये ५०० रुपये किलोनं मिळणारं मटण धुळवडीच्या मुहूर्तावर ६०० रुपयांवर विकलं गेलं.


केवळ चिकनच नव्हे, तर मासे विक्रीलाही कोरोनाचा जबर फटका बसलाय. रत्नागिरीच्या मच्छी मार्केटमध्ये शुकशुकाट पसरला आहे. जिथे मोठ्या प्रमाणात मासे खाल्ले जातात, त्या कोकणात ही परिस्थिती होती. मग धंदा करायचा तरी कसा, असा प्रश्न मच्छी विक्रेत्यांना पडलाय.


चिकन-मच्छी खाल्ल्यानं कोरोना होत नाही. हा गैरसमज दूर करण्यासाठी चिकन फेस्टीव्हल भरवण्याची घोषणाही पशूसंवर्धनमंत्री सुनील केदारांनी केली, पण कोरोनाची दहशतच एवढी आहे की, खवय्यांचीही तोंड भीतीनं बंद झाली आहेत.