ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर कोरोनाचा कुठलाही प्रभाव नाही
पर्यटकांनी कोरोनाला घाबरण्यापेक्षा योग्य काळजी घेतल्यास आनंदावर विरजण पडणार नाही असे मत व्यक्त केले.
चंद्रपूर : कोरोनामुळे पर्यटन स्थळ ओस पडली आहेत. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्यामुळे लोकांनी ताडोबा फेऱ्या रद्द केल्या आहेत. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प यासाठी अपवाद ठरला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर कोरोनाचा कुठलाही प्रभाव झालेला नाही. ठरल्याप्रमाणे सर्व पर्यटक ताडोबात टायगर सफारीसाठी दाखल होत आहेत.
रविवारी ताडोबात पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते आणि आज देखील ताडोबात सर्व गाड्या फुल आहेत. काही प्रमाणात परदेशी पर्यटकांनी बुकिंग रद्द केले असले तरी देशांतर्गत पर्यटकांनी ही कमी भरून काढली असल्याचे मानले जात आहे. पर्यटकांनी मात्र कोरोनाला घाबरण्यापेक्षा योग्य काळजी घेतल्यास आनंदावर विरजण पडणार नाही असे मत व्यक्त केले.
भारतात कोरोना व्हायरसचे १०७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाला स्वत:पासून लांब ठेवण्यासाठी डॉक्टरांनी काही सोपे उपाय सांगितले. डॉक्टरांनी वेळोवेळी हात धुण्याचा सल्ला दिलाय. सॅनिटायझर आणि हॅन्डवॉशचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एकीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे, तर दुसरीकडे जगभरातील तब्बल ७३,९६८ कोरोना रूग्ण सुखरूप बरे झाले असल्याची बातमी समोर येत आहे. मृत्यूच्या वाटेतून बाहेर येणाऱ्या रूग्णांमध्ये ५४,२७८ रूग्ण चीनमधील आहे.