विशाल करोळे, झी 24 तास औरंगाबाद  : डॉक्टर बनायचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र हे स्वप्नच आता संकटात सापडलंय. याचं कारण ठरलंय ते कोरोना! कोरोनाच्या साथीचा निवासी आणि इंटर्न डॉक्टरांनी फारच धसका घेतलाय. कोरोनामुळं डॉक्टरांच्या भविष्यावरच गंडांतर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये शिकणाऱ्या दुस-या वर्षातले डॉक्टर्स सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या कोरोनानं या शिकाऊ डॉक्टर्सची झोपच उडालीय. बारावी आणि सीईटीत उत्तम गुण मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत एमबीबीएसला प्रवेश घेतला.


मात्र त्यांची दोन्ही वर्षं कोरोनामुळं वाया गेली. कोरोना असल्यानं त्यांचा फारसा अभ्यास काही झालाच नाही. शिवाय कोरोनामुळं मान मोडून ड्युटी करावी लागली.


दुसऱ्या वर्षीही कोरोनाचा कहर सुरूच असल्यानं थिअरी क्लासेसही अडचणीत आलेत. 14 दिवस कोरोना पोस्टिंग आणि उर्वरित दिवस नॉन कोरोना पोस्टिंग अशी कसरत त्यांना करावी लागतेय.


दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेआधी विद्यार्थ्यांना तयारीसाठी 45 दिवसांची सुट्टी मिळायची. मात्र यावर्षी ती सुट्टीही मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यात हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या रिक्त जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळं शिकाऊ डॉक्टरांवरचा ताण आणखी वाढत आहे.


एकेकाळी डॉक्टर बनणं हे समाजात स्टेटस सिम्बॉल होतं. पण कोरोनासारख्या महामारीच्या काळात डॉक्टरांची अवस्था युद्धभूमीवरील सैनिकांसारखी झालीय.


सैनिकांप्रमाणेच डॉक्टरकीचा व्यवसायही डेंजरस ठरत असल्यानं भविष्यात किती पालक आपल्या मुलांना डॉक्टर व्हायला पाठवतील, हा मोठा प्रश्नच आहे.