ठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना
ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.
ठाणे : राज्यात मुबंई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी मनपाच्यावतीनं विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. शहरातील झोपडपट्टी भागात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
ठाणे महापालिका लवकरच किसन नगर भागात दोन फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. त्याचसोबत लोकमान्य नगर, वागळे इस्टेट परिसरात नगरसेवकांच्या मदतीनं संसर्ग टाळण्यासाठी काम करणार असल्याचंही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पीपीई कीट घालून प्रत्येक रुग्णाजवळ जात चौकशी केली. आणि कोरोनाबाधितांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. तर ठाण्यात टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आले असून, कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे शहर नवी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. बेलापूर, तुर्भे, सानपाडा, ऐरोली, दिघा या ठिकाणीही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी कल्याण आणि डोंबिवली येथेही रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.