मुंबई  : सामान्य नागरिक कोरोनाच्या आजाराने बेजार झाला आहे. त्यात खासगी दवाखान्यांकडून अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याने अनेक जण हैराण झाले झाले आहेत. भरमसाठ बिलाला आता लगाम घालण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. कोविड-१९ विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यावेळी टोपे यांनी हे निर्देश दिले आहेत.  बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. 


 खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. मात्र आता खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल.  शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जाईल. शासनाने निश्चित केलेले दर केवळ कोरोना उपचारासाठी नाही तर सर्वच रोगांवरील उपचारासाठी आहेत, असे टोपे यांनी सांगितेल. 


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पथके वाढवा अधिकच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्या. कोरोना विषाणू तपासणीचे अहवाल चोवीस तासात आलाच पाहिजे याबाबत खात्री करा. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. सोलापूर शहरातील सर्व दवाखान्यातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड रिक्त आहेत, याची माहिती लोकांना कळण्यासाठी डॅशबोर्ड तयार करा, अशा सूचना  टोपे यांनी यावेळी दिल्या.


 १८ वैद्यकीय दवाखान्यात प्लाझ्मा थेरपी 


राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित दवाखान्यात प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार आहे. तसेच वाढता मृत्यूदर पाहता सर्व जिल्ह्यांमध्ये यासंबंधी समिती स्थापन करण्यात येणार  आहे. शहरातील ट्रेसिंगचे प्रमाण वाढविले पाहिजे. एका रुग्णामागे किमान २५ लोकांचे ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन लोकांची संख्या वाढविण्याचीही आवश्यकता आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा कोविड केअर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्याची आवश्यकता आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची नियुक्ती करा. टेली आयसीयू आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या १२०  बेडच्या वॉर्डचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचनाही  टोपे यांनी केल्या.