प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनच दर पडले. अगदी कोंबड्या फुकट देखील वाटल्या गेल्या. पण, अशा वेळी देखील कोकणातील महिला बचत गटांनी कोंबड्या विकत लॉकडाऊनच्या काळात तब्बल २५ लाखापेक्षा देखील जास्त कमाई केली. कोणत्याही प्रकारचं मार्केटिंग न करता महिला बचत गटांनी ही किमया साधली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना आला आणि ब्रायलर कोंबड्यांचे  अर्थात चिकनचे दर पडले. अगदी कोंबड्या फुकट देखील वाटल्या गेल्या. पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागल्याचं देखील पाहायाला मिळालं, पण याच संकटाच्या काळात कोकणात बचत गटांच्या माध्यमातून लाखोंच्या कोंबड्या विकल्या गेल्या. कोणतीही जाहिरातबाजी नाही शिवाय मार्केटिंग देखील नाही. अगदी घरातून येत ग्राहकांनी या कोंबड्या ३०० रूपयापासून ७०० रूपयाला खरेदी केल्या.


कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात चिकन बद्दल अनेक गैरसमज होते. परिणामी लोकांनी गावठी कोंबड्यांकडे आपला मोर्चा मिळवला. याचा परिणाम असा झाला की कोंबड्या देखील मिळेनासे झाल्या. अगदी दोन पैसे जास्त मोजायची तयारी देखील ग्राहक दाखवू लागले. कोकणातल्या ग्रामीण भागात लोक अनेक किलोमीटरचं अंतर कापत घरी येऊ लागले, आणि कोंबड्या विकत घेवू लागले. शिवाय, अंड्यांना देखील चांगला भाव मिळू लागला.


रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात महिलांना कोंबड्यांची विक्री करत  २५ लाखांपेक्षा देखील जास्त कमाई केली आहे..जिल्ह्यात हा एक रेकॉर्डच म्हणावे लागेल. अगदी घर बसल्या महिलांना दुप्पट पैसा देखील मिळाला. याकरता गुंतवणूक देखील खूपच कमी होती. शिवाय, गटाच्या माध्यमातून विनव्याजी कर्ज देखील मिळत आहे. शिवाय, कोंबड्यांचं लसीकरण करण्याकरता देखील या महिलांना कुणावर अवलंबून राहावं लागले नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या उमेद अभियानातंर्गत या साऱ्या गोष्टी करण्यात आल्या.


महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरता सरकारी पातळीवर देखील चांगले प्रयत्न केले गेले. .त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली गेली. आपला संसार सांभाळत कोणतीही विशेष मेहनत न घेता, अधिकचा वेळ न देता महिलांना चांगले पैसे मिळू शकतात. याकरता अधिकाऱ्यांनी देखील घेतलेला पुढाकार हा त्यांची कसोटी पाहणारा होता, कारण महिलांचा प्रतिसाद कसा असेल? हा प्रश्न देखील होताच.


कोरोनाच्या काळात महिलांनी मोठी उलाढाल केली असली, तरी वर्षभर देखील त्यांना चांगले पैसे मिळतात. शिवाय, लाखोंची उलाढाल देखील होत आहे. सध्याचा काळ हा कठिण असाच आहे. सगळ्या उलाढाली ठप्प झालेल्या असताना महिलांनी केलेल्या कष्टाला फळ मिळालं. अगदी वर्षभर विविध उद्योगधंद्याच्या माध्यमातून त्या आपल्या संसाराला हातभार लावतात. कोंबड्यांच्या माध्यमातून झालेली ही उलाढाल कोरोनाच्या काळात मोठी असली, तरी वर्षभराचे आकडे देखील लक्षवेधी असेच आहेत.