कोरोना : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका घरीच तपासणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील सर्वात महत्वाचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळाने घेतला तो म्हणजे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा. याबरोबरच दहावीचा शेवटचा भूगोलाचा २३ मार्चचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत झालेले सर्व पेपरच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आता शिक्षकांना 'वर्क फ्रॉम होम' ही व्यवस्था मिळणार आहे.
दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना घरीच तपासण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात मंडळाने पत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्रात जमावबंदीपाठोपाठ आता संचारबंदी करण्यात आली आहे. यामुळे आता शिक्षण विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कशा तपासणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर मंडळाने तोडगा काढला असून शिक्षकांना 'वर्क फ्रॉम होम'ची व्यवस्था करून दिली आहे.
बोर्डामार्फत घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० दरम्यान पार पडली होती. तर १० वीची परीक्षा ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान पार पडणार होती. मात्र दहावीचा शेवटचा पेपर म्हणजेच भूगोलाचा पेपर करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी उत्तपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम सुरु करण्यासंदर्भात बोर्डाने महत्वाची सूचना केली आहे.