मुंबईसह राज्यात आजही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंता वाढवणारी वाढ
मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्य़े आजही मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्य़े आजही मोठी वाढ झाली आहे. राज्यात आजही कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. आज राज्यात कोरोनाचे ६११२ नवे रूग्ण वाढले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ४४,७६५ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अकोला,अमरावती, यवतमाळमध्ये आजही रूग्णसंख्येतील वाढ लक्षणीय आहे.
दुसरीकडे मुंबईत ही कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईत आज ८२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे होणा-यांपेक्षा लागण होणा-यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस अॅक्टिव्ह रूग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंता वाढवत आहे. मुंबईत आजही ६५३३ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना जेव्हा राज्यात दाखल झाला. तेव्हा देखील अशाच पद्धतीने रुग्णांची वाढ सुरु झाली होती. येणारे काही दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. अजूनही अनेक जण कोरोनाबाबत गंभीर नाहीत. अनेक लोकं निष्काळजीपणे बाहेर फिरत आहे. त्यामुळे त्यांच्यासह इतरांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.
कोरोनाची चाचणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरु केली तर हा आकडा वाढण्याची भीती आहे. कोरोनाचे अँटिबॉडिज तयार झाल्या असल्या तरी नवीन कोरोना व्हायरसवर मात करता येईलच असा काही लोकांना गैरसमज आहे. दुसरीकडे लस घेतल्यानंतर ही कोरोनाची लागण झाल्याच्या काही घटना पुढे आल्या आहेत.
वातावरणात होणारा बदल आणि लोकांचा निष्काळजीपणा या दोन्ही गोष्टी कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. लोकं सोशल डिस्टंसिंग पाळत नाहीत. लोकलमध्ये होणारी गर्दी आता चिंतेचं कारण होत आहे. कारण मुंबईतही आता रुग्ण वाढीचा वेग वाढताना दिसत आहे. लोकं जर असेच निष्काळजीपणे वागत राहिले तर पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील असा इशारा आधीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिला आहे. लोकाचं असं बेफिकीरी वागणं हे लॉकडा आमंत्रण देण्यासारखंच आहे. हे लक्षात घ्यावं लागेल.