नागपूर : राज्याच्या उपराजधानीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. शासकीय रुग्णालयांपाठोपाठ शहारातील 61 खाजगी रुग्णालयांना कोव्हिड उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. मात्र शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळं बेड्सची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांत कोव्हिड 19 रुग्णांवर उपचार व्हावे. यासाठी शहरातील नोंदणीकृत सर्वच खाजगी रुग्णालयांना कोव्हिड उपचार सुरू करण्यासंदर्भात नोटीस देण्यात यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले आहेत. मनपाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करून कोणतीही कार्यवाही न केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.


कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव नागपुरात वाढत आहे. कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. नागपुरात काल ४८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महापालिका आणि आरोग्य यंत्रणांपुढील आव्हानं आता आणखी वाढली आहेत.


नागपूर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५ हजार ४३० वर गेला आहे. तर नागपुरात आत्तापर्यंत १७५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.