मुंबई: राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढले असून ४३.३५ टक्के इतके झाले आहे.  गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याचे दिसून आले आहेत. राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पहिला रुग्ण आढळला आहे. तर ३१ मार्च अखेर राज्यात ३०२ रुग्ण आढळले होते. त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात १० हजार ४९८ रुग्ण होते. त्यातील १७७३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १६.८८ टक्के होते.


३१ मे अखेर राज्यात ६७ हजार ६५५ रुग्णांपैकी २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढत ४३.३५ टक्के एवढा झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी ८००० रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.