मुंबई : देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या नव्याने लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. असे असताना महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. (Corona Situation Worrisome In Maharashtra) असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदविले आहे. इतर राज्यांनाही दक्ष राहण्याचा इशारा  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढला आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार 316 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 57 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या एक लाखाच्यावर पोहोचली आहे.  या चिंताजनक स्थितीला लोकल रेल्वे, लग्नसराई आणि नागरिकाचा निष्काळजीपणा भोवला आहे, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदवले आहे. कोरोनाचा धोका वाढत असल्याने इतर राज्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. 


राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नाही। कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला आहे.


महाराष्ट्रात यामुळे कोरोनात वाढ


- कोरोनासंदर्भातील दक्षता घेण्याकडे कळत-नकळत दुर्लक्ष  
- सर्वांसाठी सुरू झालेल्या लोकल रेल्वे, लग्नसराईचे दिवस
- कोरोनाचे नियम पाळण्याबाबत लोकांचा निष्काळजीपणा  


दरम्यान, महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात या तीन राज्यांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पंजाबमध्ये दोन जिल्ह्यात रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. पतियाला आणि लुधियाना जिल्हयात ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या बाबतीत दिल्ली सरकारनेही सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.


काही दिवसांपूर्वी केरळमध्ये महाराष्ट्रासारखी झपाट्याने रुग्णवाढ होत होती, मात्र आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आले असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथके पाठवली जात आहेत, तसेच, राज्यांच्या यंत्रणांना पुन्हा कार्यतत्पर बनवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. त्यासह लसीकरणाचा वेग वाढण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले असून लसनिर्मितीही वाढवली जाणार आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कुठल्याही राज्यात लसचा तुटवडा नाही. राज्यांना मागणीनुसार लस पुरवली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.